मंडळी भारतातील कोट्यवधी स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. गेल्या वर्षी खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या दरात मोठी वाढ केली होती, ज्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली होती. आता पुन्हा एकदा हे दर वाढण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (VI) या येत्या नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅन्सचे दर वाढवण्याच्या तयारीत आहेत.
या संभाव्य वाढीचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. ग्राहकांना मोबाईल सेवा वापरण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.
ब्रोकरेज फर्म बर्नस्टाईनच्या अहवालानुसार, ही टॅरिफ वाढ कंपन्यांच्या दीर्घकालीन उत्पन्नवाढीच्या धोरणाचा भाग आहे. यामधून त्यांचे उत्पन्न वाढवून नेटवर्क आणि सेवा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.
गेल्या वर्षी कंपन्यांनी 5G सेवा सुरू करूनही त्याच्या दरात फारशी वाढ केली नव्हती. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं की, सुरुवातीला 5G युजर्सवर आर्थिक भार टाकण्यात येणार नाही. मात्र आता कंपन्यांना 5G नेटवर्कचा विस्तार, स्पेक्ट्रम खरेदी आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागत आहे.
यामुळे कंपन्या आता हा आर्थिक भार ग्राहकांवर टाकण्याच्या तयारीत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. जर ही दरवाढ झाली, तर मोबाईल युजर्सना मोठा धक्का बसू शकतो.