मंडळी आजच्या घडीला मोबाईलशिवाय कोणतेही काम सहज शक्य होत नाही. त्यामुळे रिचार्ज कितीही महाग झाला, तरी लोक तो करतातच. तरीही, रिचार्जचे दर खूप वाढले आहेत अशी तक्रार आपण नेहमीच ऐकतो. आता पुन्हा एकदा मोबाईल युजर्सला झटका बसण्याची शक्यता आहे, कारण देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या — जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया — लवकरच आपल्या रिचार्ज प्लॅन्सचे दर वाढवू शकतात.
याआधी कधी झाली होती दरवाढ?
जुलै 2024 मध्ये या कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅन्समध्ये मोठी वाढ केली होती. त्यावेळी युजर्सना इंटरनेट व कॉलिंगसाठी जास्त पैसे मोजावे लागले. आता पुन्हा एकदा प्लॅन्स महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती आहे.
नवीन दरवाढ कधी होणार?
उपलब्ध माहितीनुसार, 2025 च्या अखेरीस म्हणजेच नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान, टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅन्स महाग करू शकतात. त्यामुळे युजर्ससाठी येणारे दिवस अधिक खर्चिक ठरू शकतात.
दरवाढीचे कारण काय?
देशभरात 5G नेटवर्कचा विस्तार वेगाने सुरू आहे. यामुळे टेलिकॉम कंपन्यांचा खर्च प्रचंड वाढला आहे. जुलै 2024 मध्ये देखील याच कारणांमुळे दरवाढ करण्यात आली होती. याशिवाय स्पेक्ट्रम खरेदी, तांत्रिक सुविधा, आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या देखभालीसाठी लागणारा खर्च भरून काढण्यासाठी कंपन्या पुन्हा दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत.